नेमके घडले कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 27 जानेवारी रोजी रात्री उशिरा केळुस्कर रोड परिसरात घडली. कमला केशव अग्निहोत्री असे मृत महिलेचे नाव असून त्या प्रभात 72 या निवासी इमारतीत वास्तव्यास होत्या.
बाल्कनीत गेली अन् घात झाला
पोलिसांना रात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास इमारतीबाहेरील फूटपाथवर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
प्राथमिक तपासात ही महिला सातव्या मजल्यावरील प्लॅटमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले. इमारतीतील सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली होती. पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता बेडरूमच्या बाल्कनीतील सेफ्टी ग्रिलचा एक भाग तुटलेला आढळून आला, त्यामुळे तिथूनच उडी मारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मृत महिलेच्या पतीने चौकशीदरम्यान पत्नी दीर्घकाळ मानसिक नैराश्यात असल्याचे सांगितले. त्याचमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या शिवाजी पार्क पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेच्या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
