Ganpati Bappa Morya: 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष का केला जातो? काय आहे इतिहास?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Ganpati Bappa Morya: आपण गणपती बाप्पा मोरया असंच म्हणतो. परंतु, गणपती बाप्पाला मोरया म्हणण्यामागे एक खास कारण आहे. याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. हा जयघोष आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आलो आहोत. पण ‘मोरया’ हा उल्लेख गणपतीच्या नावासमोर कधी आणि कसा जोडला गेला? यामागचा इतिहास अतिशय रंजक आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिराशी संबंधित तो आहे. श्री मोरया गोसावी महाराजांच्या भक्ती आणि तपश्चर्येमुळे मोरगावचा मयुरेश्वर चिंचवडला आल्याची मान्यता आहे. याबाबतच देवस्थानाचे विश्वस्त जितेंद्र देव यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
2/7
श्री मोरया गोसावी यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शाली गावात श्रीवामनभट्ट शालीग्राम आणि पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. या दाम्पत्याला अनेक वर्ष संतती नव्हती, त्यामुळे त्यांनी इ.स. 1324 मध्ये मोरगावच्या मयुरेश्वराची कठोर उपासना सुरू केली. तब्बल 48 वर्षांच्या तपश्चर्येनंतर मयुरेश्वर प्रकट झाले आणि म्हणाले की तुमच्या नशिबात संततीचं सुख नाही. पण तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. त्यामुळे मीच तुमच्या पोटी जन्म घेईन आणि लोककल्याण करीन.
advertisement
3/7
त्यानुसार, इ.स. 1375 मध्ये मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच ते गणेशभक्तीत रमले त्यामुळे लोक लाडाने त्यांना ‘मोरया’ म्हणू लागले. श्री मोरयांना योगिराज श्री नयनभारती गोसावींच्या रूपाने सद्गुरु प्राप्ती झाली. श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यामुळे लोक त्यांना गोसावी असे संबोधू लागले.
advertisement
4/7
श्री मोरया गोसावी महाराज दर महिन्याच्या चतुर्थीला मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेत असत. आयुष्याच्या उत्तरार्धातही महाराज दरमहा मोरगावला जात असत. एकदा पावसाळ्यात सर्व नद्या पार करून ते मोरगावला पोहोचले, पण ते मंदिरात पोहोचेपर्यंत मंदिर बंद झालं होतं. दर्शन न झाल्याने ते दुःखी झाले. मयुरेश्वराचा धावा करू लागले.
advertisement
5/7
त्यावेळी प्रसन्न होऊन मयुरेश्वर प्रकट झाले आणि म्हणाले, तू वयस्कर झाला आहेस, तुला मोरगावाला येण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः चिंचवडला तुझ्याजवळ येतो. तेव्हापासून मोरगावचा मयुरेश्वर चिंचवड येथे आला. त्यावेळी मयुरेश्वरांनी मोरया गोसावींना आशीर्वाद असाही दिला की लोक माझ्या नावानंतर तुझे नाव घेतील. तेव्हापासून गणपती बाप्पाच्या नावापुढे मोरया या शब्दाचा उल्लेख केला जाऊ लागला, असे जितेंद्र देव सांगतात.
advertisement
6/7
श्री मोरया गोसावी महाराज अन्नदानाला विशेष महत्त्व देत असत. त्यांच्या काळात चिंचवडमध्ये अन्नसत्र, उत्सव, यात्रा आणि पूजा यांची परंपरा सुरू झाली. मात्र सतत लोकांशी संवादामुळे त्यांची साधना खंडित होऊ लागली. त्यामुळे त्यांनी मयुरेश्वराकडे संजीवन समाधीची परवानगी मागितली.
advertisement
7/7
मार्गशीर्ष वद्य षष्टी, इ.स. 1561 रोजी पवन नदीच्या काठी त्यांनी समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय तब्बल 186 वर्षे होते, असे मानले जाते. त्यांच्या समाधीमुळे पवन नदीचा काठ पवित्र झाला आणि चिंचवड हे गणेशभक्तांचे प्रमुख तीर्थस्थान ठरले. स्वतः श्री मोरया गोसावी महाराज गणपतीचे अवतार होते व त्यांच्या पुढील सात पिढ्यांमध्ये गणेशाचे अंश रूपाने अस्तित्व होते असे मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ganpati Bappa Morya: 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष का केला जातो? काय आहे इतिहास?