जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. निवडणुकीचा निकाल हा 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यात झालेल्या मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 63.88 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
एक दशकभरानंतर होत असलेल्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध मुद्दे प्रचारात आणले. नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत आघाडी केली. तर, भाजप आणि पीडीपी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे जवळपास सगळेच केंद्रीय नेतृत्व प्रचारात उतरले होते.
advertisement
कोणते मुद्दे होते प्रचारात?
जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत कलम 370, विकास, रोजगाराचा मुद्दा प्रचारात मुख्य होता. भाजपाने कलम ३७० हटवल्याच्या समर्थनात बाजू मांडली. जम्मू-काश्मीरच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे भाजपने प्रचारात सांगितले. लोकसभा निवडणुकीत तुरुंगात असलेल्या रशीद इंजिनियरच्या विजयानंतर फुटीरतावाद्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर राज्यात प्रथमच वाल्मिकी समाजानेही मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्या मतदानाबाबत निवडणुकीदरम्यान या समाजात प्रचंड उत्साह दिसून आला.
एक्झिट पोलनुसार सत्ता कोणाची?
'न्यूज 18 इंडिया' च्या महापोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे. भाजपला 28 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीडीपीला 6 तर इतरांना 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, जम्मूच्या 43 जागांवर मतदान झाले. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला 36.4 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला फक्त जम्मूमध्ये 41.3 टक्के मतं मिळू शकतात. पीडीपीला 4.4 टक्के मते मिळतील, तर इतरांना 17.9 टक्के मिळतील असा अंदाज आहे. याचाच अर्थ जम्मू भागात भाजप आपलं वर्चस्व राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
'गुलिस्तान' च्या एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 28 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 3 ते 6 जागांवर यश मिळू शकते. तर, नॅशनल कॉन्फरन्सला 28-30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पीडीपीला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतरांना 8 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
'न्यूज 24-चाणक्य'च्या एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला 35 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पीडीपीला 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतरांचा 12 ते 16 जागांवर विजय होण्याचा अंदाज आहे.
रिपब्लिक टीव्ही-पार्कच्या एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 28 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला 31 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पीडीपीला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतरांचा 8 ते 16 जागांवर विजय होण्याचा अंदाज आहे.