मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून त्यांच्या या दौऱ्यात राज्याच्या राजकीय आणि विकासात्मक पातळीवर काही निर्णायक घडामोडी घडल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारच्या आगामी रणनीतीसंदर्भात दिल्लीच्या उच्चपातळीवर बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून स्पष्ट झालं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढवणार की स्वबळावर जायचं, याबाबतही निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
डिसेंबरपूर्वी ‘मिनी विधानसभा’ निवडणूक?
एकीकडे विधानसभेच्या ‘मिनी निवडणुकी’संदर्भात दिल्लीतील बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही पुढे येत आहे. या निवडणुका महायुतीसाठी एक प्रकारची लिटमस टेस्ट ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर महायुतीसमोर या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान असणार आहे.
महापालिका निवडणुकीत कुठं महायुती तर कुठं स्वबळ
मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्लीत रणनीती ठरवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः पुणे आणि ठाणे महापालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं आहे. महायुतीमधील जे पक्ष ज्या महापालिकेत ताकदवर आहेत, त्यांनी त्या महापालिकेत स्वबळावर लढावं असा सूर उमटत आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल. आवश्यकता भासल्यास सत्ता समीकरण जुळवण्यासाठी महायुतीतील पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात.
ठाणे, पुण्याचं गणित काय?
ठाण्यात शिंदे गट सध्या प्रभावी आहे. तर, भाजपनेही आक्रमत पवित्रा घेतला आहे. पुण्यात भाजप ताकदवर आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी त्यांची थेट लढत अपेक्षित असून शिंदे गटाचा फारसा प्रभाव नाही. तर, काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार आहे.
मुंबईत महायुती की स्वबळ?
मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत शिंदे गट 100 हून अधिक जागांसाठी आग्रही आहे. तर, भाजप 227 पैकी 150 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जागा वाटपांचा तिढा असल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील आहे.