सिंधुदुर्ग: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र प्रचाराला वेग आला आहे. कोकणात देखील सर्वच राजकीय पक्ष ताकद लावत आहेत. त्यासाठी मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला जातोय. पण कोकणातील सर्वसामान्य मतदारांच्या भावना वेगळ्याच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत. पैकी दोन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत आहे. तर एका मतदार संघात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत आहे. येथील मतदारांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या समस्यांचा पाढा वाचला आहे.
advertisement
या तिन्ही मतदार संघातील उमेदवार सध्या प्रचाराला गती आली आहे. मात्र रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पाबाबत मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट आहे. सर्वसामान्य लोक रोजगाराच्या संधी मागत आहेत. परंतु, रस्ते आणि पाखाड्या यांच्या चक्रव्यूहात अडकलेला प्रत्येक उमेदवार उद्योग रद्द करण्याची घोषणा करण्यातच धन्यता मानत आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर सिंधुदुर्गाचा सर्वांगिण विकास कसा होणार? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांतून विचारण्यात येतोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फूटीनंतरची चुरशीची निवडणूक; कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कोण मारणार बाजी?
मतदार संघात उद्योग येणं गरजेचं
या तिन्ही मतदारसंघात आरोग्य, शिक्षण, पाणी अशा प्राथमिक सुविधाबाबत अंधार आहे. ग्रामीण भागात चांगले रस्ते आणि विजेचे प्रश्न कायम आहेत. रोजगाराच्या समस्या तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत. येथील तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर जात आहेत. नोकरीचे पर्याय नसल्याने बाहेर जाण्याशिवाय तरुणांकडे पर्याय नाही. त्यामुळे मतदार संघाची प्रगतीच खुंटली आहे. ज्या वेळी स्थलांतर थांबेल, तेव्हा आपोआपच प्रगतीसाठीचा दबाव येईल. म्हणून या मतदारसंघात उद्योग येण गरजेचे आहे, असे स्थानिक भरत परब सांगतात.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोकणातील रोजगाराचे मुद्दे घेऊन आज कित्येक वर्षे प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र निवडून आल्यावर दिलेली आश्वासन ही नेते मंडळी विसरत आहेत. यामुळे कोकणातील रोजगाराच्या प्रश्नावर कायमच प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या राजकारण्यांवर विश्वास नाही. फक्त निवडणुका आल्या की हे उमेदवार मतासाठी घोषणा देऊन जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र इथे रोजगार काहीच आलेला नाही. म्हणून इथल्या तरुणांना घर, आई वडील यांना सोडून शिक्षण व नोकरी साठी बाहेर जावे लागत आहे. ही परिस्थिती बदलायला हवी अशी इच्छा सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केली.