मंगळवारी निर्णय, बुधवारी ताटातूट
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. यामुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शहराध्यक्ष सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, हे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्यात आले होते. त्यानुसार, दादांनी अनुभवी चेहरा म्हणून अॅड. नीलेश निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
advertisement
तो फोन शेवटपर्यंत लागलाच नाही...
मंगळवारी रात्री हा निर्णय निश्चित झाल्यानंतर, बुधवारी सकाळी ७ वाजेपासून नीलेश निकम हे अजित दादांना फोन करून त्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करत होते. "मी वारंवार संपर्क साधत होतो, पण दादांचा फोन लागत नव्हता. कदाचित ते विमान प्रवासात असावेत, असा विचार मी केला. मात्र, काही वेळातच त्यांच्या अपघाताची बातमी धडकली," असे सांगताना निकम यांचा कंठ दाटून आला.
ज्या नेत्याने आपल्याला नवी जबाबदारी दिली, त्यांच्याशी एक शेवटचा संवादही होऊ शकला नाही, ही सल निकम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. अजित पवारांच्या निधनाने पुणे महानगरपालिकेने केवळ एक मार्गदर्शकच नाही, तर आपल्या अखेरच्या निर्णयावर स्वाक्षरी करणारा खंबीर लोकनेताही गमावला आहे.
