कर्वेनगर परिसरातील ‘द टेरिटरी ऑफिस’ येथे 14 ते 15 मार्च दरम्यान घरफोडीची घटना घडली होती. या घटनेत चोरट्याने सुमारे 6 लाख 71 हजार रुपयांचा माल लंपास केला होता. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये सोनी कंपनीचा कॅमेरा, महागडे लेन्स, दोन ड्रोन, आयफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी रॉयल एनफिल्ड हिमालयन दुचाकीवरून फिरताना दिसून आला. यानंतर पोलिसांनी चोरीतील आयफोनच्या लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. आयफोनचे लोकेशन वेळोवेळी बदलत असल्याने आरोपी सतत राज्य बदलत असल्याचे स्पष्ट झाले. तपासात तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर मार्गे मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशाकडे जात असल्याचे समोर आले.
पुणे पोलिसांनी विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधत सापळे रचले. वाराणसी पोलिसांच्या मदतीने अखेर मिर्झापूर येथे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा बांगलादेशातील ढाका येथील रहिवासी असून, वेगवेगळ्या नावांनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून तो देशभरात घरफोड्या करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट तसेच विविध देशांची चलने जप्त केली आहेत. यामध्ये अमेरिकन डॉलर, चिनी, मलेशियन, सिंगापूर, कॅनेडियन आणि नेपाळी चलनाचा समावेश आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यवसायाने शेफ असून त्याने बांगलादेशी महिलेशी विवाह केला होता. तिच्या मदतीने त्याने बांगलादेशी नागरिकत्व मिळवले आणि काही काळ तो बांगलादेशात राहिला. त्यानंतर तो पुन्हा भारतात येऊन पत्नीसमवेत तेलंगणामध्ये राहत होता. या काळात त्याने तेथे तब्बल 36 घरफोड्या केल्याचे उघड झाले असून, त्यापैकी 29 गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.
बाईकची विशेष आवड असल्याने आरोपीने 7 मार्च रोजी एक दुचाकी खरेदी केली होती. मात्र त्यावर नंबर प्लेट न लावता तो विविध राज्यांत फिरत होता. अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने एक आयफोन टॅब चोरला होता. तो टॅब अधूनमधून सुरू करत असल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना मिळत होते आणि त्याचाच धागा पकडून पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.
आरोपीविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत. देशभरात घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या नेतृत्वात पथकाने ही कामगिरी बजावली. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.






