पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास अपघात
बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे जगताप कुटुंब देवदर्शनासाठी तेलंगणा येथील तिरुपती बालाजीला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब शनिवारी बारामती येथून दर्शनासाठी रवाना झाले होते. दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे अंदाजे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हुबळी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना, त्यांच्या पुढे जाणाऱ्या एका ट्रकने अचानक ब्रेक दाबला. यामुळे जगताप कुटुंबाच्या चारचाकी वाहनाची त्या ट्रकला जोरदार धडक बसली.
advertisement
अनिल जगताप यांचा जागीच मृत्यू
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अनिल जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वैशाली जगताप या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हुबळी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कुटुंबातील त्यांची एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवदर्शनावरून परतत असताना झालेल्या या भीषण अपघातामुळे बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
