मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग गावातील महिला बचत गटाशी संबंधित हा प्रकार आहे. पुणे–पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी रात्री महिला बचत गटाच्या एका मॅडमने बचत गटातील महिलांना एकत्र केले. जेजुरी येथे देवदर्शनासाठी जायचे आहे,असे सांगून महिलांना बसमध्ये बसवण्यात आले. धार्मिक स्थळाचे नाव ऐकल्याने अनेक महिलांनी कोणतीही शंका न घेता या प्रवासाला होकार दिला.
advertisement
मतदानासाठी महिलांवर दबाव
15 जानेवारी रोजी सकाळी मात्र या महिलांच्या हातात अचानक मतदान ओळखपत्रे (वोटर कार्ड) देण्यात आली आणि मतदान करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. अनेक महिलांना आपण नेमके कुठे आहोत, कोणत्या निवडणुकीसाठी मतदान करत आहे, याची पूर्ण कल्पनाच नव्हती. काही महिलांना हा प्रकार संशयास्पद वाटला, मात्र त्या वेळी विरोध करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची हिंमत त्यांना झाली नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
देवदर्शनाच्या नावाखाली दिशाभूल
या प्रकारानंतर महिलांना पुन्हा गावात आणण्यात आले. संपूर्ण घटना लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याची जाणीव महिलांना झाली. त्यानंतर बचत गटातील अनेक महिलांनी थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत लेखी तक्रार दाखल केली आहे. देवदर्शनाच्या नावाखाली आपली दिशाभूल करून बोगस मतदान करवून घेतल्याचा आरोप त्यांनी संबंधित मॅडम आणि इतर कार्यकर्त्यांवर केला आहे.
बोगस मतदान किती झाले?
या प्रकरणामुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोगस मतदान नेमके कुणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले? या प्रकरणामागे कोणता उमेदवार किंवा राजकीय पक्ष आहे? यामध्ये किती महिलांचा वापर करण्यात आला? याचा सखोल तपास होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील अशिक्षित व भोळ्या मतदारांच्या सुरक्षेचा आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
