बुधवार पेठ म्हटलं की, अनेकांच्या मनात सर्वात आधी वेश्या व्यवसायाचीच प्रतिमा येते. हळूहळू हीच प्रतिमा बुधवार पेठेची ओळख बनत चालली आहे. मात्र, या ठिकाणाची एक वेगळी, सकारात्मक बाजूही आहे. ही दुसरी बाजू दाखवण्यासाठी पुण्यातील लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी बुधवार पेठेवर एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी या परिसराचे वेगळे, वास्तव चित्र मांडले आहे. याविषयी त्यांनी 'लोकल 18'ला माहिती दिली आहे.
advertisement
पुण्याचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातले वेगवेगळ्या पेठ. त्यातील एक अतिशय महत्वाची पेठ म्हणजे बुधवार पेठ. शहराचा हा मध्यवर्ती भाग. बुधवार पेठ एक व्यापारी पेठ होती. आजही तिची ओळख बऱ्यापैकी तीच आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजही येथेच यावे लागते. आर्थिक बाजुशिवाय सांस्कृतिक आणि शैक्षणिक बाजू पण बुधवार पेठेस आहे. पण अलीकडील काही वर्षात बुधवार पेठची ओळख या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो अशीच बनतं चालली आहे.
लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी सांगितलं की पुण्यातील अनेक महत्त्वाच्या वास्तू, दुकाने, मंदिरे, संस्था, रस्ते, चौक आणि नाट्यगृहे–चित्रपटगृहे हे सर्व बुधवार पेठेत आहेत. परंतु, 'बुधवार पेठ' म्हटले की लोकांच्या मनात सर्वप्रथम वेश्या वस्तीचाच विचार येतो. त्यामुळे ही पेठ बराच काळ थट्टेचा विषय बनली असून तिची बदनामीही झाली आहे. वास्तविक पाहता, प्रत्येक शहरात असा एक भाग असतोच, पण बुधवार पेठेचा इतिहास जागोजागी विखुरलेला आहे जो कोणी समजून घेत नाही, पाहत नाही. या पेठेवर लागलेला चुकीचा शिक्का पुसण्यासाठीच पुण्याची समृद्ध बुधवार पेठ हे पुस्तक लिहिले आहे.
ऐतिहासिक, वारसा संपन्न आणि अनेक दृष्टींनी समृद्ध असलेल्या या पेठेच्या नाण्याची दुसरी बाजू सुप्रसाद पुराणिक यांनी आपल्या पुस्तकातून मांडली आहे. पुस्तकात बुधवार पेठेचा समृद्ध इतिहास मांडण्यात आला आहे. यात ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर, मानाचे गणपती, तुळशीबाग, तसेच पेशवेकालीन वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.याशिवाय, बुधवार पेठेतील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू, संस्था आणि ओळख निर्माण करणारी ठिकाणे यांची माहितीही या पुस्तकात दिली आहे. अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पैलूंच्या माध्यमातून लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी बुधवार पेठेचे एक वेगळे आणि सकारात्मक चित्र वाचकांसमोर मांडलं आहे.