काय आहे नेमके प्रकरण?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात सध्या सभामंडप आणि भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जानेवारी महिन्यापासून भाविकांसाठी मंदिर प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी महाशिवरात्रीलाही भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले होते. मात्र, शनिवारी दुपारी खासदार निशिकांत दुबे यांनी या नियमांना केराची टोपली दाखवत मंदिरात प्रवेश केला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दुबे यांचे हेलिकॉप्टर खेडमधील एका खासगी जागेत उतरले. तेथून ते मोटारीने भीमाशंकरला पोहोचले. पोलिसांनी लावलेले दोन सुरक्षिततेचे बॅरिकेड्स पार करून त्यांची गाडी थेट मंदिरापर्यंत गेली. 'आम्ही परिसराचे सर्वेक्षण करत आहोत' असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि दुपारी आरतीच्या वेळी खासदारांना गाभाऱ्यात प्रवेश देऊन दर्शन घडवले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
नियम धाब्यावर बसवून झालेल्या या 'व्हीआयपी' दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी आता मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला जाब विचारला आहे. नियमांचे उल्लंघन का झाले, याचे स्पष्टीकरण आता संबंधितांना द्यावे लागणार आहे.
