एकट्या जनकल्याण रक्तपेढीत दररोज सुमारे 100 रक्तदात्यांची गरज भासते. मात्र सणानंतर ती संख्या निम्म्याने घटली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त, गर्भवती महिला, तसेच कॅन्सर आणि थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत आहे. शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांत रक्ताच्या कमतरतेमुळे काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सणानिमित्त शिबिरे कमी झाल्याने आणि अनेक रक्तदाते गावाकडे गेल्याने रक्तसाठ्यात ही अचानक घट झाली आहे. विशेषतः 'O निगेटिव्ह' आणि 'B पॉझिटिव्ह' रक्तगटांचा साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. पुण्यात सध्या कार्यरत 35 रक्तपेढ्यांपैकी जवळपास सर्वांकडे रक्तसाठ्याचा साठा फक्त काही दिवसांचा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक संदीप अनगोंळकर म्हणाले, “रक्तदान शिबिरे पुन्हा सुरू होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान केले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. प्रत्येक थेंब रक्त अनमोल आहे, आणि त्यातूनच जीव वाचू शकतो.”
दिवाळीनंतरचा काळ साधारणतः रक्तदानासाठी मंद असतो; त्यामुळे अशा वेळी रुग्णालयांना अधिक ताण सहन करावा लागतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित रक्तदानाची सवय लावल्यास अशा तुटवड्यांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते.
