पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील पिंपरी कॅम्प परिसरात भर दिवसा दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. भावेश काकराणी असं जखमी तरुणाचं नाव आहे. जखमी व्यापारी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
जखमी तरुण भावेश काकराणी आपल्या दुकानासमोर उभा होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून हल्लेखोर आले आणि गळ्यातील चेन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, भावेश यांनी जोरदार प्रतिकार केला. पण हल्लेखोरांनी पिस्तुल काढली आणि भावेश यांच्या पायाच्या मध्ये गोळी झाडली. अचानक गोळीबार झाल्यामुळे भावेश जागेवर कोसळले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
advertisement
या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेला हल्लेखोर गोळीबार करून पिस्तुल लपवत पळून जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये गोळीबाराने जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या आईच्या मदतीने उपचारासाठी चालत जाताना दिसत आहे.
दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे पिंपरी कॅम्प परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास सध्या सुरू असून हल्लेखोराच्या मागावर 10 पथके या तपासासाठी रवाना केली आहे. दुचाकी वरून आलेल्या हल्लेखोराचा आम्ही शोध घेत असून लवकरच आरोपी जेरबंद केला जाईल, अशी माहिती पोलीस उप आयुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिली.
