पुणे शहरात सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार, एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सायबर सेक्युरिटी एक्सपर्टला 'उच्च परतावा' मिळणाऱ्या स्टॉक मार्केटचा प्रचार करणाऱ्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं होतं. त्या माध्यमातून सायबर सेक्युरिटी एक्सपर्टची खोट्या शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे फसवणूक करण्यात आली. तक्रारदाराला ऑगस्टमध्ये एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्स ॲपवर मेसेजच्या माध्यमातून एक लिंक शेअर करण्यात आली होती. त्याला त्या लिंकवर क्लिक करून एका व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईंट व्हायचं होतं.
advertisement
तो त्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईंट देखील झाला. त्या ग्रुपमध्ये जवळपास 100 हून अधिक सदस्य होते. त्यापैकी अनेक सदस्य ग्रुपवर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या प्रॉफिट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत होते. नंतर ग्रुप ॲडमिनने त्याला एक फॉर्म भरण्यास सांगितले आणि स्टॉक मार्केटमध्ये नफा कमावून देणाऱ्या ट्रेडिंग ॲपमध्ये लॉग इन करण्यास सांगितले. 8 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान, या सायबर सेक्युरिटी एक्सपर्टला चेन्नई, उल्हासनगर (ठाणे), भद्रक (ओडिशा), फिरोजपूर (पंजाब), पिंपरी-चिंचवड आणि गुरुग्रामसह इतर ठिकाणी असलेल्या बँक अकाउंटमध्ये 55 वेळा 73.69 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
सायबर सेक्युरिटी एक्सपर्टने इन्स्टॉल केलेल्या अॅपवर त्याला 2.33 कोटी रूपयांचा नफा झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो ते करू शकला नाही. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादाराला त्यासाठी 10 टक्के कर भरण्यास सांगण्यात आले होते. सायबर सेक्युरिटी एक्सपर्टला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली, त्याने सोमवारी (13 ऑक्टोबर) एफआयआर नोंदवली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सायबर क्राइम पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग घोटाळ्यांमध्ये वाढ झाल्याचे नोंदवले आहे. फसवणूक करणारे सामान्यतः ट्रेडिंग टिप्स, व्हर्चुअल लेक्चर्स आणि मोबाइल अॅप्सद्वारे उच्च परताव्याचे आश्वासन देऊन पीडितांना आकर्षित करतात. वारंवार सूचना आणि जागरूकता मोहीम करून सुद्धा नागरिक अशा घोटाळ्यांना बळी पडत आहेत, याबद्दल अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.