या सणाची खासियत म्हणजे अंगणात मांडलेली भातुकली. लाकडी, मातीच्या, स्टील, पितळ, तांब्याच्या मिनिएचर भांडी-कुंडी, गॅस शेगडी, तवा, कुकर, मिक्सर, टेबल फॅन, ताट-वाट्या या खेळण्यातल्या या छोट्या वस्तू मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देतात आणि घरगुती जीवनाचे अनुकरण करताना त्यांना संस्कार, शिस्त आणि परंपरेची ओळख करून देतात.
Diwali Recipe: खमंग अन् खुसखुशीत सांगलीचा चिवडा! पाहा 1kg प्रमाणात अगदी सोपी रेसिपी
advertisement
बोम्मरिल्लू हा सण प्रामुख्याने आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. मात्र, सोलापूर, नगर, पुणे आदी भागात स्थायिक झालेल्या तेलुगू समाजानेही ही परंपरा जोपासली आहे. दिवाळीपासून सुरू होणारा हा खेळ तुळशी विवाहापर्यंत चालतो. मुली या काळात घरातल्या मोठ्यांना पाहून त्यांच्या दैनंदिन कामांची नक्कल करतात. चहा बनवणे, भाजी शिजवणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, ताट वाढणे वगैरे. छोट्या आकारात तयार केलेला फराळही या खेळाचा भाग असतो. पाहुण्यांना अगदी मिनिएचर प्लेट्समध्ये फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य केले जाते.
सुनीता चिंतल गेली 58 वर्षे हा सण साजरा करत आहेत. त्या सांगतात, हा फक्त खेळ नाही, तर एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय आहे. एकत्र कुटुंबात राहत असताना मुलं-पालक, शेजारी, नातेवाईक सगळेच यात सहभागी व्हायचे. आता विभक्त कुटुंब पद्धती वाढली असली तरी या सणामुळे पुन्हा सगळे एकत्र येतात. मुलं मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून दिवसभर या खेळात रमून जातात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
आजच्या धकाधकीच्या काळात मुलांना संस्कृती आणि परंपरेशी जोडून ठेवण्याचे काम ‘बोम्मरिल्लू’ करत आहे. घरातल्या प्रत्येकाने या सणात भाग घेतल्याने कौटुंबिक बंध अधिक दृढ होतात. आई-वडिलांना पाहून मुलं कामं शिकतात, जबाबदारी आणि शिस्त या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात.
पारंपरिक खेळांच्या माध्यमातून बालपणाचा आनंद आणि कौटुंबिक एकता जपणारा ‘बोम्मरिल्लू’ हा सण आता आधुनिक काळातही तेवढ्याच उत्साहात साजरा होताना दिसतो आहे. या निमित्ताने केवळ मुलांच्याच नाही, तर मोठ्यांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटते आणि अंगणातील भातुकलीचा तो लहानसा संसार सणासुदीच्या आनंदात रंगून जातो.