Pune News: पुणे जिल्ह्यातील आदितीची स्मार्टफोन- संगणकाविना नासामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी निवड, पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
भोर तालुक्यातील निगुडघर जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षांची विद्यार्थिनी अदिती संदीप पार्थे हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) च्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे.
पुणे: भोर तालुक्यातील निगुडघर जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षांची विद्यार्थिनी अदिती संदीप पार्थे हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) च्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. आर्थिक अडचणी, ग्रामीण पार्श्वभूमी आणि मर्यादित साधनांमध्येही अदितीने जिद्द, मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अदितीच्या घरात स्मार्टफोन नाही आणि शाळेत संगणकाची सोय नाही, तरीही ती आज अमेरिकेतील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थेच्या दारात पोहोचली आहे. रोज सुमारे 3.5 किलोमीटर अंतर चालत ती शाळेत जाते आणि परत येते. पावसाळ्यात डोंगर उतारांवरील पाण्यामुळे रस्ता धोकादायक होतो, तरीही तिच्या शिक्षणात खंड पडत नाही. तिचे वडील आणि मामा पुण्यातील मार्केटयार्डमध्ये मजुरी करतात, तर आई शेतीत काम करते. अदिती सध्या मामामामींकडे राहते. तिचं स्वप्न आहे PSI (पोलीस उपनिरीक्षक) बनण्याचं, पण नासाच्या दौऱ्याची संधी मिळाल्याने आता तिच्या मनात विज्ञानाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे.
advertisement
पुणे जिल्हा परिषद आणि आंतरविद्यापीठीय खगोलभौतिकी केंद्र (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमांतर्गत नासा आणि इस्रो भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी एकूण 16121 विद्यार्थ्यांचे अर्ज आले, त्यापैकी तीन फेऱ्यांनंतर अखेरीस 25 विद्यार्थ्यांची नासा दौऱ्यासाठी निवड झाली असून, अदिती त्यापैकी एक आहे. शाळेत संगणक नसल्यामुळे मुख्याध्यापक अशोक बांदल यांनी स्वतःचा लॅपटॉप वापरून विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान दिले. अदिती केवळ अभ्यासूच नाही, तर वक्तृत्व, क्रीडा आणि नृत्य क्षेत्रातही चमकली आहे. तिच्या यशानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तिला सायकल आणि शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे.
advertisement
अदितीचे कुटुंबीय सांगतात, आम्ही कधी विमान पाहिलं नाही, आणि आता आमची मुलगी अमेरिकेला जाणार आहे. हे आमच्यासाठी स्वप्नासारखं आहे.IUCAA तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या प्रवासासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. मराठी विद्यार्थ्यांना भाषेचा अडथळा येऊ नये म्हणून मराठी भाषिक भारतीय वैज्ञानिक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान, अंतराळ आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हाती घेतला आहे. यासाठी 2.2कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आला आहे.अदिती पार्थेचा प्रवास हा केवळ तिचा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक जिद्दी विद्यार्थ्याच्या स्वप्नांना पंख देणारा प्रेरणादायी प्रवास आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणे जिल्ह्यातील आदितीची स्मार्टफोन- संगणकाविना नासामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी निवड, पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव