महावितरणाने राज्यभरातील सर्व ग्राहकांना हळूहळू टीओडी मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. या मीटरमुळे ग्राहकाला वेळोवेळी वीज वापराची माहिती मिळते आणि कोणत्या वेळेत किती वीज वापरली गेली हे पाहता येते. मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटरचे रीडिंग आपोआप सर्व्हरवर पोहचते, ज्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते आणि वेळेची बचतही होते.
टीओडी मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना महाविद्युत या अॅपद्वारे वीज वापराचे रीडिंग पाहता येते. हे अॅप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. ग्राहक फक्त आपला ग्राहक क्रमांक वापरून अॅपमध्ये लॉगिन करू शकतात. याशिवाय विद्युत नियामक आयोगाने नुकतेच मंजूर केलेल्या बहुवार्षिक प्रस्तावानुसार दिवसा वीज वापरल्यास प्रति युनिट 80 पैसे इतकी अतिरिक्त सूट मिळते.
advertisement
टीओडी मीटरमध्ये छेडछाड झाल्यास मीटर लगेच महावितरणच्या सर्व्हरवर याची माहिती पाठवते. मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण त्या ठिकाणी जाऊन विद्युत कायद्यातील कलम 135 आणि 138 अंतर्गत वीजचोरीसाठी कारवाई करते. ऑगस्ट महिन्यात पकडलेल्या सहा वीजचोरांपैकी दोन ग्राहकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली तर उर्वरित चार ठिकाणी वीजचोरीची रक्कम वसूल केली गेली आहे.
या स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीजचोरीवर अंकुश बसतो आणि महावितरणला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने वीज वितरणाचे व्यवस्थापन करता येते. ग्राहकांसाठीही हे मीटर फायदेशीर आहे. कारण ते त्यांच्या वीज वापरावर लक्ष ठेवू शकतात. बिलाची पडताळणी करता येते आणि उपलब्ध सवलतींचा फायदा घेता येतो.