चाकण कृती समितीनेही पंचक्रोशीतील नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या दोन्ही प्रयत्नांमुळे सरकारचे लक्ष अखेर या समस्येकडे वेधले गेले. 28 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत बैठक झाली. या सर्व प्रक्रियेनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष चाकण येथे पाहणी दौरा केला आणि वाहतुकीच्या समस्येचे प्रत्यक्ष निरिक्षण केले.
advertisement
राज्य सरकारने प्राथमिक टप्प्यात मंजूर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीबरोबरच तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीकरिता 60 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर केले आहेत. या निधीचा वापर करून चाकण औद्योगिक क्षेत्रातील 9 प्रमुख रस्त्यांचे सुधारणा काम हाती घेतले जाईल. या प्रकल्पामुळे केवळ वाहतुकीचा ताण कमी होणार नाही तर उद्योग क्षेत्राला आणि नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
हे होणार मोठे फायदे
आगामी काळात या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक वाहतूक अधिक सुरळीत होईल, ट्रॅफिक जाममध्ये घट होईल आणि रोजच्या प्रवासात वेळेची बचत होईल. याशिवाय चाकण परिसरातील नागरिक आणि वाहनचालक आता सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील. ही योजना औद्योगिक विकासासही चालना देईल आणि चाकण परिसरातील आर्थिक घडामोडींवर सकारात्मक परिणाम करेल.