पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोरेगाव मुळ या गावात दसऱ्याच्या दिवशी घडलेला एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सीमोल्लंघनाचा सोहळा साजरा करताना एका व्यक्तीने भरदिवसा हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी गावातील काही व्यक्तींनी दोन पिस्तुलांचे पूजन करून त्यानंतर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार कसा घडू शकतो? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सणासुदीच्या दिवशी केलेल्या या बेजबाबदार कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवस उलटूनही पोलिसांकडे तक्रार नाही
विशेष म्हणजे, या घटनेला दोन दिवस उलटूनही संबंधित व्यक्तीविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. पोलिसांनीही स्वतःहून गुन्हा नोंदवलेला नाही. यामुळे पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित होत असून, नागरिक सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
पोलिसांची निष्क्रियता चर्चेत
“महाराष्ट्राचा बिहार झाला का?” असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांबाबत आणि पोलिस प्रशासनाच्या शिथिलतेबाबत नागरिक सर्रास बोलू लागले आहेत. कायद्याची भीती संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गावातील या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा उघडपणे वापर होणे हे गंभीर चिंतेचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांकडे सरकार आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.