2015 साली मेळघाटामधील आदिवासी युवकांनासोबत घेऊन युवा मेळघाट या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आदिवासी समाजाची भाषा आणि संस्कृतीसाठी वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' पर्यंत येऊन पोहोचला आहे. हा प्रवास कोण्या एका व्यक्तीचा नसून महाराष्ट्र आणि भारतातील संपूर्ण आदिवासी समाजाचा सामूहिक प्रवास असल्याचे मत राईस फाउंडेशनचे संस्थापक डॉ. ऋषिकेश खिलारे यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
आतापर्यंत 15 आदिवासी भाषा डॉक्युमेंट करण्यात आल्या असून एका भाषा डॉक्युमेंटेशनदरम्यान तब्बल तीन हजार लोकांशी थेट संवाद साधण्यात आला आहे. देशातील 15 प्रमुख आदिवासी समाजांतील सुमारे 3 कोटी लोकांना भेडसावणाऱ्या भाषिक अडचणी दूर करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. आदिवासी समाजाकडून राज्यभाषेकडे सहज संवाद साधता यावा यासाठी आवश्यक टूल्स विकसित करण्यात येत असून, भविष्यात एआय आधारित मॉड्युलद्वारे आदिवासी भाषांचे लाईव्ह ट्रान्सलेशन उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.
प्रदर्शनात प्रेक्षकांना पाहण्यासाठी दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती, आदिवासी लोकजीवन, लोककला आणि रानभाज्या यांचे छायाचित्रे आणि माहिती मांडण्यात आली आहे. आदिम भाषेपासून सुरू झालेला हा प्रवास आज एआय तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला असून, बोलीभाषांवरील सखोल संशोधनाचे दर्शन घडते. देशातील 23 राज्यांतील 250 आदिवासी समूहांमधील तज्ज्ञांच्या सहभागातून हे संशोधन करण्यात आले आहे. राईस फाउंडेशनच्या वतीने आदिवासी संस्कृतीच्या भाषा, समाज, पर्यावरण, पुरातत्त्वीय आणि मानवशास्त्रीय मानकांच्या आधारे संशोधन केले जाते.
आदिवासी बोलीभाषांसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील पर्यायी शब्द असलेले बालकोश, भाषाकोश, संस्कृतीकोश तसेच आदिवासी लोकसाहित्यावर आधारित अभ्यासपूर्ण काम येथे सादर करण्यात आले आहे. पंधरा आदिवासी भाषांतील नऊ लाखांहून अधिक शब्दांचे संकलन करण्यात आले असून, त्यापैकी 1678 छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन येथे पाहायला मिळते.याची नोंद गिनीज रेकॉर्ड मध्ये ही करण्यात आली आहे. या उपक्रमातून लोकल टू ग्लोबल कनेक्ट साधण्याचा प्रयत्न असून, समाजाने या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. पुणे पुस्तक महोत्सवात आलेल्या नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर भेट देत आदिवासी संस्कृती आणि बोलीभाषांचे समृद्ध वैभव अनुभवले आहे.