गिरीश मुरुडकर यांनी शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड जपली. ही आवड केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पुढील पिढीपर्यंत सहजपणे पोहोचावी, या उद्देशाने त्यांनी कार्याला सुरुवात केली. शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक ग्रुपमध्ये जाऊन ते मोफत अभिनय कार्यशाळा घेत आहेत. या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारपेक्षा अधिक मुलांना अभिनय, नेपथ्य आणि रंगमंचाचे प्राथमिक तसेच प्रगत धडे दिले आहेत.
advertisement
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासापुरते शिक्षण पुरेसे नाही, तर वक्तृत्व, अभिनय, लेखन आणि सर्जनशीलता यांसारख्या गुणांचा विकास होणेही तितकेच आवश्यक आहे, असे मुरुडकर यांचे मत आहे. उत्साही संस्था, शिक्षक आणि पालकांना आपल्या मुलांमधील कला गुण विकसित व्हावेत असे वाटते. अशा मुलांसाठी छोटे-छोटे वर्कशॉप्स आयोजित करून त्यांना अभिनय आणि नेपथ्याचे प्रशिक्षण दिले जाते. योग्य वयात कला गुणांना वाव मिळाला, तर त्या मुलांचे व्यक्तिमत्त्व अधिक आत्मविश्वासपूर्ण घडते, असे ते सांगतात.
अभिनय क्षेत्रात आज मोठ्या संधी उपलब्ध असल्या तरी योग्य आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था तुलनेने कमी आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी गिरीश मुरुडकर यांनी सन 2000 साली भारत फ्लेग फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच कलेच्या क्षेत्रातही भरीव काम केले जाते. अवयवदान, नेत्रदान यांसारख्या सामाजिक उपक्रमांबरोबरच अभिनय कार्यशाळांची सुरुवात याच संस्थेमधून झाली.
एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा, नाटक, शॉर्ट फिल्म यांचे प्रशिक्षण देताना वयाची कोणतीही अट नसते. अगदी 60 वर्षांपर्यंतचे नागरिकही या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन अभिनयाचे धडे घेत आहेत. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी कोणतेही ठरावीक मानधन घेतले जात नाही. क्वचित मिळणारे मानधनही पूर्णपणे सामाजिक कार्यासाठीच वापरले जाते, असे गिरीश मुरुडकर यांनी स्पष्ट केले.
अभिनय कलेच्या जतनासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ती पोहोचवण्यासाठी गिरीश मुरुडकर यांचा हा अनोखा आणि निस्वार्थ उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





