पुणे : पुण्यासह परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यासोबतच पुणे परिसरातील अनेक मंदिरेही पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.
ओंकारेश्वर मंदिरात शिरले पाणी -
पुण्यातील मुसळधार पावसामुळे ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिरात पाणी शिरले आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने सकाळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.
advertisement
चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरही पाण्याखाली गेले असल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी हे मंदिर काही प्रमाणात पाण्याखाली जाते. मात्र, परंतु आजच्या पावसाने मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. पाण्याने संपुर्ण समाधी मंदिराला वेढा घातला आहे. मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. मंदिर परिसरात पाणी शिरले की, पाऊस काळ चांगला झाला अशी आख्यायिका आहे. त्यातच आता या मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे.
प्रशासनाने दिल्या या महत्त्वाच्या सूचना -
पावसाचा असाच जोर वाढल्यास पाणी पातळी अजून वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी आणि सतर्कता बाळगावी. तसेच मंदिर व नदीकाठ परिसरात सेल्फी काढणे, स्टंटबाजी करणे व परिसरात गर्दी करणे या गोष्टी टाळाव्यात, अशा सूचना मंदिर प्रशासन, चिंचवड पोलिस व पिंपरी-चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.
थेरगाव येथील केजूबाई बंधारा येथील संपूर्ण केजूबाई मंदिरही पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. सध्या फक्त या मंदिराचा कळस दिसत आहे.
कोल्हापुराला पूराचा धोका?, पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, रस्त्यावर आले पाणी VIDEO
दरम्यान, आळंदीतील इंद्रायणी नदीलासुद्धा पूर आला आहे. यामुळे भक्त पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले आहे. काल दुपारी इंद्रायणीने काठ सोडल्याने इंद्रायणी नदीवरील दोन्ही काठच्या सर्व समाधी, मंदिरे, छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणीला महापूर आल्याचे चित्र आहे.
पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शाळे पाठोपाठ पुण्यात आता ऑफिसलाही सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.