या वर्गात नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला, शारीरिक खेळ, योगासने तसेच संगीतोपचाराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले तज्ञ शिक्षक आणि समुपदेशक निस्वार्थ भावनेने आपला वेळ या मुलांसाठी देत आहेत. मुलांना कलेद्वारे स्वतःला व्यक्त करण्याची संधी देणे आणि त्यांना आनंदाचा अनुभव मिळवून देणे हा या वर्गाचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
Heart Health Tips : हार्ट अटॅकपासून वाचवतो 'हा' मासा! हृदयरोग टाळण्यासाठी आहे उत्तम उपाय..
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. सध्या जवळपास 30 दिव्यांग विद्यार्थी नियमितपणे या वर्गात सहभागी होत आहेत. शहरातील विविध भागांतून येणारी ही मुले सहकारनगर भागात एकत्र येतात आणि विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. विशेष म्हणजे, मानसिक दिव्यांग मुलांसाठी छंदकला वर्गाची सुविधा शहरात क्वचितच आढळते. त्यामुळे या उपक्रमाला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महिन्यातील दोन शनिवारी हे वर्ग घेतले जातात. सहा सभासद मिळून हा उपक्रम राबवत आहेत. नाटक, नृत्य, गायन, योगासने आणि व्यायाम या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेसह शारीरिक तंदुरुस्तीचे धडे दिले जातात. त्यातून मुलांना सकारात्मक वातावरण मिळत असून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थेच्या कार्यकर्त्या गायत्री सहस्रबुद्धे म्हणाल्या, मानसिक दिव्यांग मुलांसाठी अशा प्रकारचे वर्ग फारसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्या कला आणि छंदांना योग्य दिशा देण्यासाठी आम्ही सहकारनगर भागात हे वर्ग सुरू केले आहेत. या उपक्रमामुळे मुलांचा शारीरिक-मानसिक विकास होतो, तसेच त्यांना आनंदी आणि आत्मनिर्भर बनवण्यात मदत होते.
सहकारनगर भागातील कला वैभव ही सेवाभावी संस्था हा छंदकला वर्ग केवळ कला शिकवण्यापुरता मर्यादित नसून, दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक उपक्रम ठरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास तेही तितक्याच जोमाने प्रगती करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.