पुणे : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा, वापरातील विहिरींचे पाणी पिण्याकरिता वापरू नये, उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न सेवन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पिण्याचे पाणी उकळून व गार करून झाकून ठेवावे, असेही म्हटले आहे.
advertisement
शौचाहून आल्यानंतर आणि जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे. अतिसार, पातळ संडास, थंडी, ताप इत्यादी आल्यासआशा, नर्सताई, आरोग्य सेवकाकडून त्वरित उपचार करून घ्यावेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर पातळ संडास, अतिसारमध्ये जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा जल संजीवनीचा (साखर-मीठ- पाणी) वापर करावा, असे महापालिकेच्या उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पावसाळ्यात या गोष्टी आवर्जून टाळा
- उघड्यावर शौचास बसू नये.
- हगवण, अतिसार, कावीळची साथ असल्यास पिण्याच्या पाण्यात क्लोरीन लिक्चिड टाकूनच प्यावे.
- जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची सफाई करावी.
- नळ गळती, व्हॉल्व्ह लिकेज असेल, तर दुरुस्त करून टाकी सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे. पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये.
- आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामध्ये होऊ देऊ नये.
- साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य- सेवक/सेविका पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांना त्वरित कळविण्यात यावे.






