उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. विभागीय विकास कामाची बैठक पार पडल्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील परतीबद्दल सूचक अशी प्रतिक्रिया दिली.
"धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कृषि विभागातील खरेदी विक्री प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. मुंडे यांची या प्रकरणामुळे बदनामी झाली ती झालीच. पण पोलीस त्यांची कारवाई करत आहे. यातून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला, तो भरून येऊ शकत नाही. कृषी खात्याबद्दल जे आरोप झाले ते मी म्हणत नाही, ज्यांनी आरोप केले त्यांना कोर्टाने दंड सुनावला आहे. आपल्याकडे न्यायालय सर्वोच्च व्यवस्था आहे, दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे, ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल, ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ, असे स्पष्ट संकेतच अजित पवार यांनी दिले.
advertisement
धनंजय मुंडेंना आता कोणत्या प्रकरणात मिळाली क्लिन चीट?
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना की विभागात खरेदी केली होती. पण या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप व्ही मर्णे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी 24 जुलै २०२५ रोजी पार पडली. यावेळी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असं मुंबई उच्च न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट मत व्यक्त केलं.तसंच, याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांना एक लाखांचा दंड ठोठावला आहे. हेतुपुरस्सर याचिका दाखल केल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला आहे.
धनंजय मुंडेंनी का दिला होता राजीनामा?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराडचं नाव समोर आलं, या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक झाली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशमुख यांच्या हत्येचे विदारक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक रोष निर्माण झाला होता. त्यानंतर, वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती, ज्यानंतर त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. मुंडेंनी त्यावेळी आपला राजीनामा वैद्यकीय कारणांमुळे दिल्याचं म्हटलं होतं. पण,संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्यांच्या सहभागावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
