डिजिटल प्रचाराला मोठे महत्त्व मिळत असले तरी प्रत्यक्ष प्रचारासाठी लागणारे झेंडे, उपरणी, कॅप, छातीवर लावण्याचे बॅच, फेटे आणि पगड्या यांची मागणीही लक्षणीय वाढली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले हे गेली तीन पिढ्या झेंडे आणि प्रचार साहित्य निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत असून, यंदा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या दुकानात विशेष गर्दी होत आहे.
गिरीश मुरुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाची महापालिका निवडणूक बहुप्रतिक्षित असल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळे प्रचार साहित्याच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. आमच्याकडे 8 ते 10 रुपयांपासून सुरू होणारी विविध प्रकारची प्रचार साहित्य उपलब्ध आहेत. कमी खर्चात मोजके, देखणे आणि आकर्षक साहित्य वापरण्यावर कार्यकर्त्यांचा भर आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
यंदाच्या प्रचारासाठी खास डिझायनर फेटे आणि पगड्या तयार करण्यात आल्या आहेत. विविध पक्षांच्या रंगसंगतीनुसार आणि चिन्हांनुसार पगड्यांचे 20 ते 25 प्रकार उपलब्ध असून, उपरण्यांचेही 7 ते 8 वेगवेगळे प्रकार बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय शाही शैलीतील उपरणी कार्यकर्त्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असला तरी प्रत्यक्ष प्रचारात दिसणारे झेंडे, पगड्या आणि उपरणी यांना आजही वेगळे महत्त्व आहे.
रस्त्यांवर, चौकाचौकांत आणि प्रचार फेऱ्यांमध्ये हे साहित्य लक्ष वेधून घेते. त्यामुळे त्याची मागणी कायम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या उत्पादन प्रक्रियेशी सुमारे 25 कारागीर जोडले गेले असून, त्यांना निवडणुकीच्या काळात रोजगारही मिळत आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रचार साहित्याचा बाजार तेजीत असून, पुढील काही दिवसांत ही लगबग आणखी वाढण्याची शक्यता आहे.