पुणे : जेजुरी नगरपरिषद मतमोजणी निकाल समोर आला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहे. जेजुरीत अजित पवार गटाने भंडारा उधळला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत अजित पवार गटाने काँग्रेसची धुळधाण केली असून तब्बल 11 जागा जिंकत नगरपरिषदेवर झेंडा फडवकला आहे. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीने विजयी मिरवणूक काढली.मात्र या मिरवणुकीदरम्यान मोठी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या विजय मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या घटनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक गंभीररीत्या भाजले असून जवळपास 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेजुरीत भव्य विजय मिरवणूक काढली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भंडाऱ्याच्या उधळणीत हा जल्लोष सुरू होता. जेजुरी गडाच्या ऐतिहासिक कमानीजवळ मिरवणूक पोहोचली असताना कापूर जाळण्यात येत होता. त्याच वेळी जळत्या कापुरावर मोठ्या प्रमाणात भंडारा पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली घटना
गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे 20 जण प्रचंड भाजले. यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचातसेच प्रभाग क्र.5 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेत होरपळलेल्या -भाजलेल्या जखमींना तातडीने येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते .या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला यामध्ये सुमारे 20 जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.
जखमींची नावे पुढील प्रमाणे
१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर
