मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 ऑगस्ट रोजी पुण्यातील विविध कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनुसार शहरातील सुरक्षेची पातळी वाढवण्यासाठी अतिरिक्त एक हजार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोमवारी (दि. 15) गृहविभाग आणि वित्त विभागाच्या संयुक्त निर्णयानुसार पुण्यातील नव्या पाच पोलिस ठाण्यांसोबतच दोन स्वतंत्र पोलिस झोन स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे.
advertisement
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की ,नव्या पाच ठाण्यांसाठी एकूण 830 मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक ठाण्यासाठी आवश्यक कर्मचारी, सहाय्यक आणि तांत्रिक टीम यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे पुण्यातील पोलिस उपायुक्तालयाच्या कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना अधिक जलद, प्रभावी आणि पोलीस सेवा मिळेल असे अपेक्षित आहे.
नव्या पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त रंजनकुमार शर्म यांच्या प्रयत्नांना विशेष मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण अन्य कोणत्याही आयुक्तालयाने एवढ्या अल्प वेळात 12 पोलिस ठाण्यांची निर्मिती करून दोन स्वतंत्र झोन स्थापन केलेले नाहीत. पुणे पोलिस आयुक्तालयाने अवघ्या एका वर्षात हे यश साध्य करून इतर आयुक्तालयांच्या तुलनेत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
पहिल्या टप्प्यात सात ठाण्यांसाठी मंजुरी मिळवणे अत्यंत कठीण होते.मात्र, प्रचंड मेहनत, समन्वय आणि योग्य नियोजनामुळे हा निर्णय शक्य झालेला आहे. या नव्या ठाण्यांच्या स्थापनेमुळे पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था अधिक मजबुत होईल. गुन्हेगारीवरील नियंत्रण वाढेल तसेच नागरिकांना सुरक्षित आणि संरक्षित वातावरण मिळेल.
या परिसरात नव्या पोलीस ठाण्यांची सोय
पुणे शहरातील सुरक्षा वाढवण्यासाठी लक्ष्मीनगर (येरवडा), लोहगाव, नऱ्हे, येवलेवाडी (कोंढवा) आणि मांजरी येथे पाच नवीन पोलीस ठाण्यांना अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या ठाण्यांमुळे नागरिकांना सुरक्षितता वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
शहरातील वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येचा विचार करता या नव्या पायाभूत सुविधा आणि पोलीस उपाययोजनांचा मोठा फायदा होईल. नवीन पोलिस ठाण्यांच्या स्थापनेसह शहरातील विविध भागांमध्ये पोलीस उपस्थिती वाढेल,त्यामुळे नागरिकांचे संरक्षण आणि शांती कायम राहील असे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे.