स्थानिक आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी आणि मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. शटल सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी 'पीएमपी' आणि 'महामेट्रो'ची मदत घेतली जात आहे. या नव्या सेवेला रविवारी पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
पुणे शहरातील पहिला मेट्रो मार्ग, जो वनाझ ते गरवारे महाविद्यालय पर्यंत आहे, तो 2022 मध्ये सुरु झाला. या मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोथरूडकरांना मेट्रो सुविधा आवडली तरी मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना वेळ आणि खर्च दोन्ही करावे लागत होते. त्यामुळे 'एंड टू एंड कनेक्टिव्हिटी' साठी शटल सेवेला सातत्याने मागणी करण्यात येत होती.
यापूर्वी पीएमपीकडून काही प्रमाणात शटल सेवा उपलब्ध होती, पण ती पुरेशी प्रभावी पद्धतीने चालवली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी चार बस कोथरूडकरांसाठी निश्चित केल्या आहेत, ज्या नियमितपणे सेवा देतील. मोफत सेवा असल्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांमध्येही मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बससेवेची मार्ग आखणी, थांबे आणि वेळापत्रक याबाबत सखोल चर्चा केली आहे. या सेवेचा मार्ग नागरिकांच्या गरजेनुसार ठरवला जाईल. शटल सेवा सोमवार ते शनिवार चालेल आणि लोकांच्या मागणीनुसार भविष्यात त्यात सुधारणा करण्यात येणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.