गेल्या काही वर्षांत चाकणमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. पोलिस आयुक्त, PMRDA आयुक्त, उपवाहतूक आयुक्त, एनएचएआय, स्थानिक आमदार, खासदार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भागातील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले, परंतु प्रत्यक्षात अडथळे दूर करणे कठीण ठरले आहे.
अतिक्रमण हटवले तरी, रस्त्यावरील दुरुस्तीचे काम अजून पूर्ण झालेलं नाही तसेच विजेचे खांब लावलेले नाहीत शिवाय अनेक ठिकाणी खडे तसेच राहिलेले आहेत. यामुळे वाहतूक पुन्हा रखडली जाते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
चाकण भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती गंभीर ठरली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव-शिक्रापूर रोड आणि चाकण-आंबेठाण मार्गावर प्रवास करताना नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. स्थानिक लोक, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी निदर्शने करून प्रशासनाकडे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
चाकणमधील अतिक्रमण कारवाई नागरिकांसाठी फक्त दृश्यात्मक ठरली आहे, प्रत्यक्षात वाहतूक सुधारण्यात ती अपयशी ठरत आहे. रस्त्यांची पूर्ण कामे करणे आणि अडथळे दूर करणे आवश्यक आहे, नाहीतर नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत राहील.