सेनापती बापट रस्त्यालगतच्या वैदूवाडीत आठ ते दहा कुटुंबांना शुक्रवारी (ता. १२) सकाळी आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आळ्या दिसून आल्या. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, यापूर्वी या भागात सकाळी आणि रात्री अशा दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. मात्र, अलीकडे फक्त सकाळी एकदाच पाणी येते आणि त्यातही दूषित पाणी मिळत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
advertisement
स्थानिक रहिवासी आयुष जाधव यांनी सांगितले की, दररोज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान पाणी येते. मात्र, शुक्रवारी आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आळ्या होत्या. पाणी वापरणे तर दूरच, हात धुण्यालाही भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. तर प्रविण डोंगरे यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले, ही समस्या फक्त वैदूवाडीपुरती मर्यादित नाही. संपूर्ण गोखलेनगर, जनवाडी, जनतावसाहत या भागात दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा त्रास आहे. पाणी हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. जर हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
पाणीपुरवठा हा आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दूषित पाणी प्यायल्याने विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. नागरिकांना दररोज पाणी शुद्ध करून वापरणे भाग पडत आहे, पण तरीही आरोग्य धोक्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. उपभियंता केदार साठे म्हणाले, एप्रिल महिन्यात पाण्याची टाकी स्वच्छ केली होती. मात्र, आता पुन्हा स्वच्छता करण्यात येणार आहे. सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याची वाहिनी एकाच ठिकाणी असल्याने आळ्या पाण्यात आल्या असाव्यात. आम्ही या प्रकरणाची तपासणी करत आहोत आणि लवकरच समस्या सोडवण्यात येईल.
तथापि, नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाही. महापालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना करून पाणीपुरवठा नियमित आणि स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा परिसरातील लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.