पुणे मेट्रो प्रकल्पाच्या तीन स्थानकांची नावं बदलण्यात आली आहेत. मंडई मेट्रो स्थानकाचं नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई’ करण्यात आलं आहे. नळस्टॉप स्थानकाच नाव बदलून ‘एसएनडीटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. तर आयडियल कॉलनी स्थानकाचं नाव ‘पौड फाटा’ असं करण्यात आलं आहे. पुढील काही दिवसांत सर्व मेट्रो स्टेशनवरच्या नेमप्लेट्स बदलण्याचं काम पूर्ण होईल, असं मेट्रो प्रशासनानं सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून मेट्रो स्टेशनच नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अखेर ती मागणी आता पूर्ण झाली आहे.
advertisement
लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक संघटनांकडून ठरावीक मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी केली होती. महात्मा फुले मंडई परिसरातील स्थानकाचं नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक’ करण्यात यावं, अशी आग्रही मागणी केली जात होती. माळी महासंघ या सामाजिक संघटनेने याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) निवेदन दिलं होतं. शिवाय, आंदोलनाचाही इशारा दिला होता. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील नळस्टॉप आणि आयडियल कॉलनी स्थानकांचं नावही बदलण्यात आलं. नळस्टॉपचं स्थानक ‘एसएनडीटी कॉलेज’जवळ असल्याने या स्थानकाला हेच नाव दिलं आहे.
तर आयडियल कॉलनीचं नव्याने नामकरण करून, या स्थानकाला ‘पौड फाटा’ म्हणून ओळखलं जाईल. या मेट्रो स्थानकांच्या नव्या नामकरणावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे, अशी माहिती ‘महामेट्रो’तर्फे देण्यात आली. अखेर, मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याविषयी शिक्कामोर्तब झाल्यावर सामाजिक संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला.
