विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे ‘आरटीजीएस किंवा एनईएफटी’च्या माध्यमाने भरायचे आहे, जे 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरायचे आहे. त्यानंतर शाळांना विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट आणि चलन विभागीय मंडळाकडे 17 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे लागणार आहे. नियमित शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज हे ‘युडायस प्लस’मधील पेनआयडीवरून शाळा प्रमुखांमार्फत भरले जाणार आहेत. तर, पुन:र्परीक्षार्थी, 17 नं चा फॉर्म भरलेले विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय घेणारे विद्यार्थी आणि ‘आयटीआय’मधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची अर्ज प्रक्रिया www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
advertisement
शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये शाळा, संस्था, विषय आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करावी. शाळेने विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर प्री- लिस्ट तपासून आणि विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्याध्यापकांनी शिक्क्यासह ती यादी एकदा नीट तपासून घ्यावी. परीक्षा शुल्क हे केवळ ICICI बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्ये RTGS किंवा NEFT द्वारेच भरावे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे सचिव पुढे म्हणाले की, अर्ज शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्थिती ‘सेंड टू बोर्ड’ आणि ‘पेड’ झाल्याची खात्री करणे ही शाळांची जबाबदारी राहील. अर्ज सादरीकरणासाठी पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या तारखांना मुदतवाढ दिली जाणार नाही. ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण न करणाऱ्या शाळांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट दिली जाणार नाहीत.
