याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव घेनंद इथल्या नाजुका रणजित थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वडगाव घेनंद इथल्या गणेश नगरमध्ये नाजुका थोरात राहतात. अल्पवयीन मुलासोबत त्यांचा आधीपासून वाद आहे. त्या वादाच्या रागातूनच अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात नाजुका यांनी दिलीय.
advertisement
अल्पवयीन मुलगा चारचाकी गाडीने थोरात यांच्या घराजवळ आला होता. त्याने गाडी रिव्हर्स घेत बरीच मागे नेली. त्यानंतर पुन्हा वेगाने येत रस्त्यावर असलेल्या लोकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लोक बाजूला गेल्याने कोणती जिवितहानी झाली नाही. मात्र नाजुका थोरात यांना किरकोळ दुखापत झालीय.
धक्कादायक बाब म्हणजे कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर अल्पवयीन मुलाने कारच्या टपावर उभा राहून शर्टही काढला. त्यानंतर थोरात यांच्याकडे बघून त्याने शिवीगाळ केली. नाजुका थोरात यांनी अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिल्यानंतर आळंदी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
