घटनेची माहिती अशी आहे की, गोविंद सोनवणे हे फार्महाऊसवर आलेल्या पाहुण्यांसाठी चहा घेऊन तळमजल्यावरील आपल्या खोलीतून पहिल्या मजल्यावर जात होते. ते परतत असताना, त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला. याचवेळी, व्हरांड्याच्या दरवाजामागे लपलेला बिबट्या अचानक समोर आलेल्या सोनवणे यांना पाहून गोंधळला. दोघेही एकमेकांना अचानक समोर पाहून गडबडले.
advertisement
बिबट्याने तत्काळ सोनवणे यांच्या दोन्ही पायांमधून कसाबसा मार्ग काढला आणि वेगाने धूम ठोकली. या धावपळीत बिबट्याच्या नखांनी सोनवणे यांच्या पायाला खरचटलं. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर घाबरलेल्या सोनवणे यांनी धावताना बिबट्याला पाहिलं. अंदाजे गुडघाभर उंचीचा हा बिबट्या असावा, असं त्यांनी सांगितलं. सोनवणे सध्या पौड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. होतले-डोंगरगाव येथील घाटमाथ्यावरील वनक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. सदर घटनेतील प्राणी बिबट्याच होता की नाही, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
