'वर्षा' बंगल्यावर नेऊन विश्वास संपादन
फसवणूक झालेले व्यापारी शैलेश जैन यांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. जैन यांच्यासोबत नियमित व्यवहार करणाऱ्या बिरजू नावाच्या दलालाने त्यांची ओळख आरोपी वैभव ठाकर याच्याशी करून दिली. वैभवने आपण 'वर्षा' बंगल्यावर अधिकारी असल्याचे भासवले आणि जैन यांना त्यांच्या कामात मदत करण्याचे आश्वासन देऊन जाळ्यात ओढले.
advertisement
विश्वास संपादन करण्यासाठी, वैभव पिवळा दिवा असलेल्या कारमधून यायचा. एका वेळी त्याने जैन यांना आपल्या कारमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर नेले. मात्र, मुख्यमंत्री सध्या बंगल्यावर उपस्थित नसल्याचे कारण देत त्यांना बाहेरूनच यू-टर्न घेऊन परत आणले. या बनावमुळे जैन यांना तो खरोखरच मोठा अधिकारी आहे, असे वाटले.
दागिने आणि सवलतीच्या सोन्याचे आमिष
विश्वास संपादन झाल्यानंतर वैभवने विविध कारणे देत जैन यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्याने कस्टम विभागात जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो, असे सांगितले. आपली पत्नी आणि सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करतात, असे सांगून त्याने जैन यांच्याकडून अनुक्रमे १.१५ कोटी रुपये आणि १.३५ कोटी रुपये किमतीचे दागिने खरेदी केले. मात्र, ठरलेली कामे पूर्ण न करता त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली.
धमक्या आणि उलट तक्रार
जैन यांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर वैभवने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन एका पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जैन आणि त्यांच्या मुलाला धमकावले, असेही तक्रारीत नमूद आहे. जैन यांनी जेव्हा वैभवविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वैभवने उलट त्यांनाच डीआरआयकडे (DRI) तक्रार करून अडचणीत आणले. वैभवच्या तक्रारीच्या आधारे जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना दीड महिना तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर जैन यांनी पुन्हा पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव ठाकर, त्याची पत्नी, सासू आणि दलाल बिरजू या चार जणांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
