उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं की, बारामतीत मी चांगल्या मतांनी विजयी होईन. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. लोकसभेला पत्नीला उभा करून मी चूक केली. आता तीच चूक विधानसभेला युगेंद्रला उभा करून शरद पवार गटाने केली आहे.
मी माझ्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवलं होतं. आमची ती चूक होती. यावेळी त्यांनीही तीच चूक केलीय. आता बारामतीची जनता ठरवेल असंही अजित पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिलीय. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी असं करायला नको होतं. पण त्यांनी चूक केलीय. आता मतदार याबद्दल योग्य निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं.
advertisement
अजित पवार यांच्याविरोधात बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांनीही अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे लहान भाऊ श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांच्या मताधिक्क्याने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. २०१९च्या विधानसभेला अजितदादा 1 लाख 65 हजारांच्या लीडने जिंकले होते. पक्ष फुटीनंतर मात्र याच बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया ताईंना 48 हजारांचे मताधिक्य देऊन एकप्रकारे अजितदादांच्याच विरोधात कौल दिल्याचं बोललं जातंय.
