पुणे : पुण्यातील फरार गुंड निलेश घायवळ याच्याभोवती तपास यंत्रणांनी आपल्या कारवाईचा फास अधिकच घट्ट केला आहे. बँक खाती गोठवून पोलिसांनी घायवळची आर्थिक नाकेबंदी केली. तर, दुसरीकडे पासपोर्ट रद्द करून आणखी एक दणका दिला. घायवळ टोळीवर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. निलेश घायवळ टोळीतला फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळविरुद्ध पोलिसांनी टोळीवर एक मोठी कारवाई केली आहे. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील घायवळ टोळीतल्या आणखी एक आरोपीला अटक केली आहे. निलेश घायवळ टोळीने खंडणी मागितली होती . यातील फरार आरोपी अमोल बंडगर भिगवण येथून ताब्यात घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळली
कर्वेनगर, शिवणे परिसरातील नामवंत शाळांतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून गुंड घायवळ टोळीने तब्बल 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी गुंड नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह तेरा जणांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याआधी पोलिसांनी घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्याची बँक खाती गोठवली गेली. आता पोलिसांच्या साखळी कारवाईमुळे त्याचे आर्थिक आणि कायदेशीर आव्हान अधिक तीव्र झाले आहे.
पासपोर्ट रद्द
मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकलेला निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. तपासात त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने पासपोर्ट मिळवल्याचाही खुलासा झाला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी अहवाल सादर केला होता.
कुटुंबीयांची एकूण 10 बँक खाती गोठवली
निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 10 बँक खाती पुणे पोलिसांनी गोठवली आहेत. या खात्यांमध्ये 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात समोर आले. निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, ‘पृथ्वीराज एंटरप्रायजेस’ यांच्या खात्यांचा समावेश आहे. या खात्यांवरील व्यवहारांसाठी आता पुणे पोलिसांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) आवश्यक आहे. त्यामुळे या खात्यातून पैसे काढणे किंवा व्यवहार करणे पूर्णपणे थांबले आहे.
हे ही वाचा :
