पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अजित पवार सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढत आहेत. अजित पवार हे बारामतीत सहयोग बंगल्यावर असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री लिहिलेली पाटी भेट दिली. पण अजित पवार यांनी या पाटीवर मुख्यमंत्री लिहिलेली अक्षरे हाताने झाकली.
advertisement
अजित पवार यांना त्यांचे नाव आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असं लिहिलेली पाटी देण्यात आली. ती स्वीकारताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री हा शब्द हाताने झाकला. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना हात काढण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शब्द झाकू नका असं म्हटलं. यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं की, असं लिहून कुणी मुख्यमंत्री झालं असतं तर आबादी आबादच झालं असतं. मॅजिक फिगर पण महत्त्वाची आहे ना, १४५ आकडा महत्त्वाचा आहे असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार आज अर्ज भरणार
अजित पवार आज आपला बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अजित पवार बारामतीत मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. बारामती येथील कसबा येथील चौकातून अजित पवारांच्या रॅलीला सुरुवात होईल. सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. तर दुपारी एक ते दीड च्या दरम्यान अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर बारामती तालुक्यातील कनेरी येथील मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करतील.
बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना तिकीट दिलंय. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादीत फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर आता विधानसभेला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या विधानसभेला अजितदादा 1 लाख 65 हजारांच्या लीडने जिंकले होते पक्ष फुटीनंतर माञ याच बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया ताईंना 48 हजारांचे मताधिक्य देऊन एकप्रकारे अजितदादांच्याच विरोधात कौल दिल्याचं बोललं जातंय.
