या अभियानात नागरिक, व्यापारी वर्ग, स्वयंसेवी संस्था, महिला गट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. स्वच्छता ही सेवा हा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे अत्यावश्यक आहे. स्वच्छतेतून आरोग्य, पर्यावरण आणि शहरी विकास यांचा पाया मजबूत होतो असे विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छतेचा संकल्प घेऊन पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेचा आदर्श शहर बनविण्यात योगदान देणे आवश्यक आहे.
advertisement
अभियानांतर्गत शहरात विविध उपक्रम राबविले जातील. सार्वजनिक जागांची स्वच्छता मोहीम यामध्ये मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसस्थानके, उद्याने, जलाशय परिसर यांची स्वच्छता करणे, सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी, सुरक्षा साधनांचे वितरण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश आहे.
स्वच्छ हरित महोत्सव अंतर्गत पर्यावरणपूरक उत्पादने, वृक्षारोपण उपक्रम, हरित जीवनशैलीवरील कार्यशाळा आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय प्लास्टिक प्रदूषणविरोधी जागरूकता वाढविण्यासाठी सिंगल-यूज प्लास्टिक टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल.
घराघरात स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी घरोघरी जनजागृती देखील केली जाईल. यामध्ये ओला-सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कंपोस्टिंग, वेस्ट सेग्रीगेशन याबाबत प्रात्यक्षिके, माहितीपत्रके आणि मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल.
या अभियानाचा उद्देश फक्त स्वच्छता राखणे नसून, नागरिकांना स्वच्छतेसाठी प्रेरित करणे, त्यांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करणे आणि शहरात दीर्घकालीन स्वच्छतेची पायाभरणी करणे आहे. महापालिका विश्वास बाळगते की, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेचा आदर्श शहर म्हणून ओळख मिळेल.
या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेणे म्हणजे फक्त शहर स्वच्छ करणे नाही, तर आरोग्य, पर्यावरण आणि जीवनशैली सुधारण्यासाठी केलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून, परिसरातून आणि कार्यालयातून स्वच्छतेसाठी योगदान देणे गरजेचे आहे असे महापालिकेने आवाहन केले आहे.
अभियानाचे उद्दिष्टे आणि महत्त्व:
नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे
स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे रूप देणे
शहरी आणि ग्रामीण भागात लक्षणीय सुधारणा करणे
पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे
प्लास्टिक प्रदूषणविरोधी जागरूकता वाढवणे
अशा प्रकारे स्वच्छता ही सेवा या अभियानाने शहरात स्वच्छतेच्या सवयी रुजवून नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.