नुकतंच हडपसर गाडीतळ परिसरात पीएमपीएल चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पोस्ट करत म्हटलं की,हे केवळ अपघात नव्हे, तर व्यवस्थेचा खून आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या अपघातांकडे केवळ 'अपघात' म्हणून पाहता येणार नाही. हा प्रशासकीय यंत्रणेचा आणि नियोजनाचा गंभीर पराभव आहे. वारंवार होणाऱ्या चुका, चालकांचा निष्काळजीपणा आणि देखभालीचा अभाव यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. या जीवघेण्या प्रवासाला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्यांची 'गांधीगिरी' : हडपसरमधील या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी चक्क पाय धरून 'गांधीगिरी' केली आणि विचारले, "तुम्हाला माणसं मारायचा परवाना मिळाला आहे का?" प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या चालकांकडून अशी चूक कशी होते, याचे उत्तर त्यांनी मागितले. या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असले तरी, प्रशासनाचे डोळे कधी उघडणार, हा खरा प्रश्न आहे.
हडपसरमधील या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, दोषी चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जर पीएमपीएल सेवा प्रवाशांना सुरक्षितता देऊ शकत नसेल, तर या व्यवस्थेचा उपयोग काय, असा संताप सामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.
