'ई-शिवनेरी'च्या फास्टटॅगमध्ये खडखडाट; बस तासभर नाक्यावरच, अखेर टोल भरण्यासाठी प्रवाशांनी जमा केली वर्गणी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अखेर कंटाळलेल्या प्रवाशांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून टोल भरला. त्यानंतरच पुण्याच्या दिशेने बसचा मार्ग मोकळा झाला.
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'ई-शिवनेरी' बसचा एक संतापजनक आणि तितकाच लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. बसच्या 'फास्टटॅग'मध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे ही बस तळेगाव टोलनाक्यावर तब्बल एक तास रोखून धरण्यात आली. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अखेर कंटाळलेल्या प्रवाशांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून टोल भरला. त्यानंतरच पुण्याच्या दिशेने बसचा मार्ग मोकळा झाला.
काय आहे नेमकी घटना?
बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील दादर येथून पुण्याच्या दिशेने ई-शिवनेरी बस (क्रमांक: MH 12 VF 5207) रवाना झाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्यावर पोहोचली. स्कॅनिंग दरम्यान बसच्या फास्टटॅग खात्यात पैसे नसल्याचे समोर आले. टोल भरल्याशिवाय बस पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका टोल कर्मचाऱ्यांनी घेतली.
advertisement
गर्भवती महिलेसह प्रवाशांचे हाल:
बसमध्ये एक गर्भवती महिला आणि वृद्ध प्रवासी मोठ्या संख्येने होते. रात्रीची वेळ आणि तांत्रिक बिघाड नसताना केवळ 'रीचार्ज' नसल्यामुळे प्रवाशांना तासभर टोलवर ताटकळत उभे राहावे लागले. बस चालकाने डेपो व्यवस्थापनाशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथूनही तात्काळ मदत मिळाली नाही.
प्रवाशांनी गोळा केली १४०० रुपयांची वर्गणी:
एसटी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचा संयम सुटला. रात्रीचे साडेदहा वाजले तरी बस हलण्याचे नाव घेत नव्हती. अखेर, बसमधील प्रवाशांनी एकत्र येत वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दंडासह सुमारे १४०० रुपयांचा टोल रोख स्वरूपात भरला. या अपमानस्पद अनुभवानंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
advertisement
पुणे-मुंबई प्रवासासाठी प्रवाशांकडून शिवनेरीचे जादा भाडे आकारले जाते. मात्र, अशा प्रीमियम सेवेमध्येही फास्टटॅग रिचार्ज नसावा, ही प्रशासनाची मोठी चूक मानली जात आहे. विशेष म्हणजे बस डिजिटल आणि ई-पद्धतीने चालत असताना केवळ व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'ई-शिवनेरी'च्या फास्टटॅगमध्ये खडखडाट; बस तासभर नाक्यावरच, अखेर टोल भरण्यासाठी प्रवाशांनी जमा केली वर्गणी









