जुन्नरमध्ये दहशत कायम! नदीच्या काठावर गेलेला शेतकरी; अचानक बिबट्यानं झडप घालून मांडी पकडली अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बिबट्याने विनोद चौरे यांच्या डाव्या पायावर हल्ला केला. बिबट्याचे चार दात त्यांच्या मांडीत खोलवर रुतल्याने ते गंभीर जखमी झाले.
जुन्नर: जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. पारगाव तर्फे आळे येथे आठ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच, आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ओतूर परिसरातील रहाटी मळा येथे पुन्हा एकदा बिबट्याने एका शेतकऱ्याला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
विनोद बबन चौरे (वय ४८, रा. ओतूर) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. चौरे हे ओतूर येथील मांडवी नदीच्या काठावर असलेली आपली पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
बिबट्याने विनोद चौरे यांच्या डाव्या पायावर हल्ला केला. बिबट्याचे चार दात त्यांच्या मांडीत खोलवर रुतल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र, चौरे यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू करताच, बिबट्याने तिथून धूम ठोकली.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विनोद चौरे यांना त्वरित ओतूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
advertisement
जुन्नर तालुक्यात सध्या ऊसतोडणी सुरू असल्यामुळे बिबट्यांचा वावर शेती आणि रहिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
जुन्नरमध्ये दहशत कायम! नदीच्या काठावर गेलेला शेतकरी; अचानक बिबट्यानं झडप घालून मांडी पकडली अन्...











