पुणे : वारकरी ज्याची वर्षभर आतुरतेनं वाट पाहतात, त्या आषाढी वारी सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यात वारकरी संत माऊलींच्या पालख्यांसह पायी पंढरपूरच्या वाटेवरून चालत असतात. त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. तसंच ठिकठिकाणी वाहतूक मार्गातही बदल करण्यात येतो. आवश्यकतेनुसार जादा गाड्यादेखील सोडण्यात येतात. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय पीएमपीएमएलकडून घेण्यात आला आहे.
advertisement
पुणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल (PMPML) अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसचं नियोजन करण्यात आलं आहे. 26 ते 30 जूनदरम्यान आळंदीकडे स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड इथून 106 बस सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा : बोला पुंडलिक वरदे...! पालखी निघणार, सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल
देहूसाठी पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी इथून 30 बस सुरू करण्यात आल्या आहेत. तर, देहू ते आळंदीसाठी 12 बस देण्यात आल्या आहेत. 29 जून रोजी आळंदीमधून पालखी प्रस्थान होणार असल्यानं 30 तारखेच्या पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणांवरून आळंदीला जाण्यासाठी 27 जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नेहमीच्या सुरू असलेल्या बस सकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू राहणार आहेत.
पुण्याहून प्रस्थानाच्या वेळी 2 जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार असल्यानं महात्मा गांधी स्थानक इथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी, इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्यात आली आहे. कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन इथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा इथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा : Ashadhi Wari: पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, घराबाहेर पडताना पर्यायी मार्ग पाहा!
हडपसर ते सासवडदरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस वाहतूक दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे सुरू ठेवण्यात येणार असल्यानं 60 जादा बसचं नियोजन केलं आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपीएमएलकडून ही व्यवस्था करण्यात आली आहे.