देहूगाव हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असून तुकाराम बीजेनिमित्त येथे मोठ्या प्रमाणात कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांतून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे आणि भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
advertisement
4 मार्च रोजी स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन आणि आळंदी येथून देहूगावसाठी एकूण 35 जादा बस सोडण्यात येणार आहेत. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत या बसफेऱ्या चालविण्यात येतील. 5 मार्च रोजी मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सर्वाधिक 207 जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट, मनपा भवन, निगडी, पुणे स्टेशन, देहूरोड स्टेशन आणि आळंदी येथून या बस उपलब्ध राहतील. त्यापैकी 116 बस सकाळच्या सत्रात, तर 99 बस दुपारच्या सत्रात सोडण्यात येणार आहेत.
6 मार्च रोजी स्वारगेट, पुणे स्टेशन, आळंदी आणि मनपा भवन येथून एकूण 49 जादा बस सोडण्यात येतील. त्यामध्ये सकाळी 33 आणि दुपारी 16 बसफेऱ्यांचा समावेश असेल. याशिवाय देहू येथे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळासाठी आळंदीला जातात. त्या दृष्टीने पुणे मनपा, पुणे स्टेशन आणि हडपसर स्थानकांतून आळंदीकरिता अतिरिक्त बसफेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. विशेषतः 5 मार्च रोजी सकाळ व दुपार सत्रात मिळून 18 बस सोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी वैद्यकीय इंडे मळा परिसरातील सैनिकी मैदानावर तात्पुरती बसथांब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देहू-आळंदी दरम्यान प्रवासासाठी संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील मोकळ्या जागेतून बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. भाविकांनी बससेवेचा लाभ घेऊन शिस्तबद्ध प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






