मनोहर पर्रीकरांसारखं रत्यावर फिरा
पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंढवा चौकात भेट दिली. यावेळी, एका महिलेने त्यांना थेट सल्ला दिला की, 'मनोहर पर्रीकर ज्याप्रमाणे अचानक ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे, त्याचप्रमाणे तुम्हीही कधीही न सांगता येऊन परिस्थिती पाहा. तरच तुम्हाला खरी समस्या कळेल.'
कोण पर्रीकर? अजितदादांचा प्रश्न
यावेळी, 'पर्रीकर कोण?' असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. त्यावर महिलेने, 'ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तुम्हाला वाहतुकीबद्दल माहिती नाही, असे होऊच शकत नाही. तुम्ही फक्त प्रश्न विचाराल आणि आम्ही उत्तर देऊ, याने काहीच फरक पडणार नाही,' असे स्पष्ट सांगितले. तसेच, समस्यांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
मी दिलगिरी व्यक्त करतो - अजित पवार
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी, नागरिकांनी अडचणींचा पाढा वाचत असताना, अजित पवारांनी 'आमची चूक झाली, आम्ही ती मान्य करतो आणि म्हणूनच यावर उपाय शोधण्यासाठी आलो आहे. तुम्हाला त्रास झाला म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं सांगून नागरिकांशी संवाद साधला.