नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर परिसरात वास्तव्यास आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला आपल्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. बाणेर रस्त्यावरून जात असताना, एका दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यांनी मुद्दाम महिलेचा पाठलाग करत तिच्याशी लज्जास्पद आणि अश्लील कृत्य केलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला हादरून गेली.
advertisement
कृत्य केल्यानंतर आरोपींनी दुचाकीचा वेग वाढवला आणि तेथून पळ काढला. पीडित महिलेने याप्रकरणी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या कलमान्वये दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाणेर पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पालक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण
बाणेर, बालेवाडी यांसारख्या वर्दळीच्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात पहाटेच्या वेळी अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी," अशी मागणी आता नागरिक करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झरेकर करत आहेत.
