वहन क्षमता वाढणार
सध्या या मार्गावर 'अब्सोल्यूट ब्लॉक सिग्नलिंग' प्रणाली कार्यरत आहे. या जुन्या पद्धतीत, दोन स्थानकांदरम्यान एका वेळी एकाच दिशेने केवळ एक गाडी धावू शकते. पहिली गाडी पुढील स्थानक पार करेपर्यंत दुसरी गाडी सोडली जात नाही, ज्यामुळे गाड्यांना विलंब होतो आणि मार्ग उपलब्ध होण्याची वाट पाहावी लागते.
मात्र, आता रेल्वे बोर्डाने पुणे ते भिगवण आणि पुढे भिगवण ते वाडी स्थानकादरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणेला मंजुरी दिली आहे. या नवीन प्रणालीनुसार, रेल्वे मार्गावर प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर सिग्नल खांब उभारले जातील. यामुळे रेल्वे गाड्यांना पुढील मार्गासाठी थांबावे लागणार नाही. गाड्या एकापाठोपाठ एक सुरक्षितपणे धावू शकतील, ज्यामुळे मार्गाची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचेल.
advertisement
'ऑटोमॅटिक सिग्नलिंग'चा फायदा
स्वयंचलित सिग्नल यंत्रणा ही गाडीच्या स्थितीनुसार सिग्नल आपोआप बदलणारी अत्याधुनिक प्रणाली आहे. या प्रणालीत रेल्वे मार्गाचे एक किलोमीटर अंतराचे 'ब्लॉक सेक्शन' तयार केले जातात. रेल्वे जेव्हा एक सेक्शन पार करते, तेव्हा तेथील सिग्नल आपोआप हिरवा होतो. यामुळे स्टेशन मास्तर किंवा मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होते. येत्या पाच ते सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि त्यानंतर वर्षभरात ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
