गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कट
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, कोथरूड भागात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याची भीती नीलेश घायवळला होती. टोळीचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी त्याने 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी हा कट रचला होता. "वेपन आणि पैसे मी देतो, केस लागली तर बाहेर काढतो" असे आश्वासन देऊन त्याने आपल्या साथीदारांना धमाका करण्याचे आदेश दिले होते.
advertisement
9 गुन्हेगारांना अटक
या कटाचा परिणाम म्हणून 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता मुठेश्वर मित्रमंडळ चौकात गप्पा मारणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हेगारांना अटक केली असून, नीलेश घायवळच्या घरझडतीमध्ये 2 जिवंत काडतुसे आणि 4 रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई केली आहे.
122 साक्षीदारांची तपासणी
या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 122 साक्षीदारांची तपासणी केली असून 6 महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या या केस मधील 8 आरोपी अजूनही फरार असून कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. तसेच, नीलेश आणि सचिन घायवळ यांनी कोथरूड परिसरात बांधलेल्या 2 बेकायदेशीर इमारतींवर हातोडा चालवण्यासाठी पोलिसांनी पुणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
घायवळ टोळीविरुद्ध दोषारोपपत्र
दरम्यान, गुन्हे शाखेने सादर केलेले हे दोषारोपपत्र घायवळ टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पोलीस प्रशासन आता फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास करत आहे. कोथरूड आणि आसपासच्या परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि गुंडांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कडक पावले उचलली जात आहेत.
