अशी झाली फसवणूक: फिर्यादी तरुणीला ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. "तुम्हाला ऑनलाइन जॉब करण्यात रस आहे का?" अशी विचारणा करून तिला एका मेसेजिंग ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सुरुवातीला तिला काही प्रसिद्ध हॉटेल्सना ऑनलाइन रेटिंग देण्याचे साधे टास्क देण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी सुरुवातीच्या काही टास्कनंतर तरुणीच्या खात्यावर छोटी रक्कम जमा देखील केली.
advertisement
गुंतवणुकीच्या नावाखाली लूट: एकदा विश्वास बसल्यावर चोरट्यांनी तिला 'प्रीपेड टास्क' आणि जास्त परतावा मिळवून देणाऱ्या योजनांचे आमिष दाखवले. याला बळी पडून तरुणीने वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण ३ लाख ७५ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, जेव्हा तिने स्वतःचे पैसे आणि कमिशन परत मागितले, तेव्हा चोरट्यांनी अधिक पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मेसेजिंग ग्रुपमधील व्यक्ती आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. "अशा प्रकारे हॉटेल रेटिंग, यूट्यूब लाईक किंवा गुंतवणुकीचे टास्क देऊन पैसे देणाऱ्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ऑनलाइन पैसे पाठवू नका," असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
